FOCUS TODAY

"अचूक बातम्या, प्रत्येक क्षणी"

बारव्हा येथे गणेश विसर्जना दरम्यान स्लॅब कोसळली, थोडक्यात जीवितहानी टळली..

बारव्हा – 18 सप्टेंबर 2024: बारव्हा येथे गणेश विसर्जनादरम्यान एक गंभीर अपघात घडला. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी एका इमारतीच्या स्लॅबवर उभे असलेल्या लोकांच्या अती भारामुळे स्लॅब कोसळला, ज्यामध्ये किमान 45 ते 50 लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


प्राथमिक तपासानुसार, स्लॅबवर उभे असलेल्या लोकांच्या अतिवजनामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती. अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि बचावकार्याला गती देण्यात आली.

अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, परंतु पोलिस व प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनास्थळी तपास सुरु असून, प्रशासनाने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

**आरोग्य मंदिर, बारव्हा येथील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
जखमींना उपचारासाठी नेले असता डॉक्टर अनुपस्थित**

गणेश विसर्जनादरम्यान स्लॅब कोसळून जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी आरोग्य मंदिर, बारव्हा येथे नेले असता, एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेने आरोग्य मंदिरातील व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गंभीर जखमींना त्वरित उपचार मिळावे, या अपेक्षेने त्यांना आरोग्य मंदिरात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे कोणताही डॉक्टर हजर नसल्यामुळे जखमींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आरोग्य व्यवस्थेवर कठोर टीका केली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी , संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई केली जावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांची आहे.या अपघातानंतर उपचार वेळेवर मिळाला असता तर जखमींची स्थिती अधिक गंभीर झाली नसती, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)