भंडारा : जिल्ह्यात मागील २४ तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाल्याकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. संभावित धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ११ सप्टेंबर रोजी सर्व शाळांना सुटी जाहिर केली आहे.
हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार रविवारी रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात सर्वदूर संततधार पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार रात्रभर आणि सोमवारी दिवसभर सुरूच होती. या पावसामुळे वैनगंगेचे जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
या पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने भंडारा ते कारधा (जुना पूल), साकोली तालुक्यातील साकोली ते खैरलांजी, सोनपुरी ते बोदरा, आमगाव ते बांपेवाडा, लाखांदूर तालुक्यातील तई ते बारव्हा, तई ते पाऊलदवना, बोथली ते बारव्हा हे मार्ग बंद करण्यात आले. ही स्थिती दुपारी ३.३० वाजतापर्यंतची होती. त्यानंतरही संततधार पाऊस सुरुच असल्याने बंद रस्त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या लगत असलेल्या पुजारीटोला धरणाचे १३ गेट, बावनथडीचे ४ गेट, संजय सरोवराचे ६ गेट, धापेवाड्याचे १७ गेट उघडण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगेची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे उघडण्यात आली आहेत. त्यातील १५ वक्रद्वारे १ मीटरने तर १८ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली आहेत. त्यातून ५३९५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यास्थितीत भंडाराजवळच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी २४३.८६ मीटर असून धोक्याची पातळी २४५.५० मीटर तर इशारा पातळी २४५ मीटर आहे.
आज शाळा बंद
जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून अनेक भागातील रस्ते, मार्ग पुराच्या पाण्याने प्रभावित झाले आहेत. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजतापासून ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे.

Leave a Reply