पोहरा – येथे पशु चिकित्सालय आहे पण नियमित आणि पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
जनावरांना पसुवैद्यकीय सेवा,संकरीत गोपैदास कार्यक्रम, रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्यक्रम, कुक्कुट विकास, शेळी मेंढी विकास कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय अधिकारी काम करीत असतो पण पोहरा येथे मागील 5 महिन्यापासून पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारी नाही.जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांच्या प्रयत्नातून डॉ. मंदकुंठवार हे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारी आले होते पण मार्च महिन्यात त्यांची बढती झाल्याने ते वर्धा येथे गेले तेव्हापासून पोहरा येथे पशु वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ नाहीत.पोहरा पशु चिकित्सालय अंतर्गत पोहरा, मेंढा, गडपेंढरी, पेंढरी, चान्ना अशी गावे येतात या गावात मोठ्याप्रमाणावर दुग्ध उत्पादक व पशुपालक राहतात. पण पोहरा येथे पूर्णवेळ पशु अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पोहरा येथे आठवड्यातून एक दिवस गुरूवारला कनेरी येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार भेट देतात. जनावर आजारी पडले तर शेतकऱ्यांना गुरूवार येण्याची वाट पाहावी लागत आहे. डॉक्टर येण्याच्या दिवसाची वाट पहात अनेक जणावरे दगावली आहेत. नियमित पशुअधिकारी नसल्याने दुग्ध व्यावसायिक व शेतकरी यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागत आहे. हा त्रास कमी व्हावा यासाठी पोहरा येथे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी पोहरा जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांनी केली आहे.
पोहरा येथे पूर्णववेळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्तीची मागणी

Leave a Reply